The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत गडचिरोली वनविभागात विशेष कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी वन्यजीव संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या जलद बचाव दल (RRT) सदस्य अजय कुकडकर यांना मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.
अजय कुकडकर यांनी अनेक वेळा कठीण परिस्थितीत जीव धोक्यात घालून वन्यजीवांना वाचवले असून, मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांच्या अथक सेवेमुळे गडचिरोली विभागात जलद बचाव कार्य अधिक प्रभावी झाले आहे.
“दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जलद बचाव दलात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांचा ऋणी आहे. हे काम केवळ जबाबदारीच नव्हे, तर माझे कर्तव्य आहे,” असे भावनिक उद्गार कुकडकर यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, विभागीय वन अधिकारी साईनाथ नरड (प्लॅन), गणेश झोळे (सामाजिक वनीकरण), सहाय्यक वनसंरक्षक प्रवीण पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
वन्यजीव संवर्धनासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान हा त्यांच्या कार्याची पावती असून, इतरांसाठीही तो प्रेरणास्थान ठरत आहे.
