गडचिरोलीच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचा जल्लोष : नवख्या विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत

5

– फुलांची सजावट, संस्कृतिक कार्यक्रम आणि पहिल्याच दिवशी साहित्यवाटपाने शाळांमध्ये उत्सवाचे वातावरण
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये २३ जून २०२५ पासून नव्या शैक्षणिक वर्षाची रंगतदार सुरुवात होत असून, त्या निमित्ताने जिल्हाभरात भव्य प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवख्या विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, स्थानिक खासदार, आमदार आणि सनदी अधिकारी यांची उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. २१ व २२ जून रोजी शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यानंतर शाळांची सजावट, फुलांची आरास, फुगे, स्वागतगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, पालक-शिक्षक संवाद, यांसारखे उपक्रम नियोजित करण्यात आले आहेत.
विशेष बाब म्हणजे, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट आणि मोजे वितरीत करण्यात येणार आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गाडे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
प्रवेशोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता निर्माण करणे, शिक्षणाविषयी उत्सुकता व सकारात्मकता वाढवणे, आणि शाळेची ओळख करून देणे हे आहे. शंभर टक्के उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठीही विशेष नियोजन करण्यात आले असून, यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी माहिती दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये साजरा होणारा हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नव्या पर्वाची उत्साही सुरुवात ठरणार आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #latestnews #breakingnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here