– नवीन विद्यार्थ्यांचे मिरवणुकीने स्वागत; सांस्कृतिक कार्यक्रम व वृक्षारोपणाने कार्यक्रमात रंगत
The गडविश्व
एटापल्ली, दि. ३० : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, जारावंडी येथे प्रवेशोत्सव व पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने झाली. ट्रॅक्टरवर सजवलेले स्वागतमंच, लेझीम व बँड पथकासह नवागत विद्यार्थ्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या वेशभूषेतून सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर टेकाम होते. प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी वासुदेव कोडापे, सरपंच सपनाताई कोडापे, उपसरपंच रमेश दुग्गा, पोलीस पाटील जनकशहा नाहमूर्ते, मुख्याध्यापक बी. एम. पंधरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
नवागत विद्यार्थ्यांचे व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मागील शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करत पारितोषिक वितरण झाले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्रकला, हस्तकला व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पर्यावरण जागृतीचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही पार पडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बी. एम. पंधरे यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक ए. एम. बारसागडे यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षिका कु. ए. आर. भुईभार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पी. डब्ल्यू. वानखेडे, एच. बी. गेडाम, बी. जी. दाऊदसरे, एल. आर. सोमकुवर, सौ. ए. एम. राणा, कु. एस. डी. जोंजाळ, शुभम मडावी आदींचे विशेष सहकार्य लाभले.
