हक्काच्या जमिनीवर इतरांचा कब्जा ; मोटघरे यांचा प्रशासनावर गंभीर आरोप

121

– ५० वर्षांपासून वनहक्कासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याची पत्रकार परिषदेत व्यथा
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २९ : धानोरा तालुक्यातील तुकुम येथील शेतकरी बळीराम आत्माराम मोटघरे हे मागील ५० वर्षांपासून आपल्या हक्काच्या वनजमिनीसाठी संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही त्यांना आजतागायत वनहक्क पट्टा मिळालेला नाही. विशेष म्हणजे, ज्योतीत असलेल्या त्याच सरकारी गवत जमिनीवर इतरांनाच पट्टे देण्यात आले असून, स्वतःच्या कसत असलेल्या जमिनीवर मोटघरे यांचा हक्क नाकारण्यात आला आहे.
मोटघरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या अन्यायाचा खुलासा करत प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी १९७२-७३ पासून सर्वे नं. १३१ वर आराजी ४.८४ हेक्टर जागा कसत होते. परंतु, वनहक्क समितीने त्यांच्या अर्जाची दखल न घेता, त्याच जमिनीवर इतरांचे नाव लावून पट्टे मंजूर केले. त्यात मंजू गावडे, रामचंद्र समर्थ, तान्यू कुंभरे आणि आलसू मडावी यांची नावे आढळून आली आहेत.
“माझे वडील आणि मी पिढ्यान्‌पिढ्या ही जमीन कसत आलो, अतिक्रमणाची नोंद असूनही आम्हाला हक्काचा पट्टा मिळाला नाही. पण जेमतेम १०-१५ वर्षे कसणाऱ्यांना पट्टे देण्यात आले. यामागे कारस्थान आहे,” असा आरोप मोटघरे यांनी केला.
ते म्हणाले की, त्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, तलाठी यांच्याकडे वारंवार लेखी अर्ज व पत्रव्यवहार केला. परंतु, याकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले. यामुळे वनहक्काबरोबरच शासनाच्या अन्य सवलतींपासूनही ते वंचित राहिले.
मोटघरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून, त्यांच्या हक्काची जमीन परत मिळावी आणि इतरांना दिलेले फसवे पट्टे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी केली.
“मी शिक्षित असूनही ५० वर्षे शासनाच्या दारात ठोकरा खातोय. पण अद्याप न्याय मिळालेला नाही. माझ्यावर अन्याय करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे,” असे ते संतप्तपणे म्हणाले.
या प्रकरणात वनविभाग व महसूल प्रशासनाने गंभीर दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनीही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here