पत्रकारांचे पेन मोडू नका, अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही : संदीप काळे यांचा सरकारला इशारा

31

– दोन दिवसांत महाराष्ट्रात चार पत्रकारांवर भ्याड हल्ले, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून संतप्त प्रतिक्रिया
The गडविश्व
मुंबई, दि. ०६ : महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांची मालिका पुन्हा जोर धरत असून केवळ दोन दिवसांत राज्यातील कर्जत, नेवासा, अकोला आणि बदलापूर येथे चार पत्रकारांवर भ्याड आणि अमानुष हल्ले झाले आहेत. या घटनांमुळे संपूर्ण पत्रकार जगतात तीव्र संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक व अध्यक्ष संदीप काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
“हे हल्ले फक्त योगायोग नसून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना गप्प करण्याचा प्रयत्न आहे. जनतेच्या समस्या, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील गोंधळ यावर प्रकाश टाकणाऱ्या पत्रकारांवर थेट शारीरिक हल्ले केले जात आहेत. हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया संदीप काळे यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला, नेवासा येथे पत्रकार शंकर नाबदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर स्थानिक गुंडांनी हल्ला चढवला. अकोला जिल्ह्यात पत्रकार सज्जाद हुसेन आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली, तर बदलापूरमधील पत्रकार कमाल शेख यांच्यावरही गंभीर हल्ला झाला.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने राज्य सरकारसमोर काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करून दोषींना कठोर शिक्षा करावी, प्रत्येक जिल्ह्यात ‘Journalist Safety Cell’ स्थापन करावी, पत्रकारांवर हल्ला हा नॉन-बेलेबल आणि गंभीर गुन्हा म्हणून घोषित करावा, तसेच हल्लाग्रस्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक व कायदेशीर मदत द्यावी, अशा या मागण्या आहेत.
“मुख्यमंत्री महोदय, हे चार प्रकरणं म्हणजे धोक्याचा स्पष्ट इशारा आहे. जर सरकारने आता पावले उचलली नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार नाही. पत्रकारांचे पेन मोडणे म्हणजे लोकशाहीच्या मुळावर घाव घालणे होय. भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत. आम्ही शांत बसणार नाही,” असा थेट अल्टिमेटम संदीप काळे यांनी दिला.
दरम्यान, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’कडून या महिन्यात राज्यभर ‘पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती’ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews
#JournalistSafety #PressFreedom #AttackOnJournalists #MediaUnderThreat #VoiceOfMedia #SandeepKale #MaharashtraNews #FreedomOfSpeech #BJPGovernment #JournalistRights #MediaViolence #DemocracyInDanger #JournalistProtectionLaw #IndiaPressCrisis

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here