“शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय करा आणि आर्थिक उन्नती साधा” : चंद्रकुमार पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन

22

– भारतीय स्टेट बँक, धानोरा शाखेच्यावतीने तुकूम येथे कृषी जनजागरण मेळावा संपन्न
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २० : शेती हे आपल्या अर्थव्यवस्थेचे कणा असून, यासोबतच शेतीपूरक व्यवसायांचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेता, भारतीय स्टेट बँक शाखा धानोरा यांच्यावतीने ग्रामपंचायत तुकूम येथे शेतकरी कृषी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला तुकूम, हेटी, मरकेगाव, तोडे, खरकाडी या गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमात बँकेचे शाखा व्यवस्थापक चंद्रकुमार पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन यांसारख्या पूरक व्यवसायांकडे वळावे, जेणेकरून उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि आर्थिक सक्षमता साधता येईल.”
कार्यक्रमात शेती कर्ज, व्यवसायिक कर्ज, पशुधन विमा, पीक विमा, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, तसेच थकीत कर्जाची परतफेड करून चालू हंगामात पीक कर्ज घेण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नवीन शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप, मृत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जविषयक मार्गदर्शन यावरही भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुमित्रा तोफा (सरपंच, तुकूम ग्रामपंचायत) होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. संगीता नरोटे (पोलीस पाटील) यांची उपस्थिती होती.
गावातील प्रतिष्ठित शेतकरी चंदुजी उसेंडी, सुरेश क्षिरसागर, भोजराज रायशिडाम, बाबुराव तोफा, शामराव सयाम, अलसू गोटा, मोतीराम उसेंडी, आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या आणि वेळेवर नूतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांनीही आपली मते व्यक्त करत बँकेच्या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे आयोजन अश्विन खोब्रागडे (कर्ज विभाग, भारतीय स्टेट बँक, धानोरा) यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here