गडचिरोली जिल्हा परिषद व ‘उमेद’तर्फे दिवाळी फराळ महोत्सवाचा शुभारंभ

47

गडचिरोली जिल्हा परिषद व ‘उमेद’तर्फे दिवाळी फराळ महोत्सवाचा शुभारंभ
– १३ ते २१ ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी विक्री स्टॉल्स
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : जिल्हा परिषद गडचिरोली व ‘उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने “दिवाळी फराळ महोत्सव व विक्री” या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. हा महोत्सव 13 ते 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत जिल्हा परिषद प्रांगणासह पंचायत समिती प्रांगणे आणि जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये भरविण्यात येणार आहे.
या महोत्सवात गडचिरोली जिल्ह्यातील विविध स्वयंसहायता समूहांनी तयार केलेले स्वादिष्ट पारंपरिक दिवाळी फराळाचे पदार्थ, आकर्षक हस्तकला उत्पादने, गृहउपयोगी वस्तू, तसेच दिवे, हार-फुले आणि शोभेच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. जिल्ह्यात एकूण 120 स्टॉल्स उभारण्यात आले असून, या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळणार आहे.
स्वयंसहायता समूहांच्या महिलांनी तयार केलेल्या फराळात शेव, चकली, चिवडा, तिळचकली, लाडू, शंकरपाळे, बालुशाही, पापड, लोणचे, मसाले यांसह इतर अनेक स्वादिष्ट पदार्थांचा समावेश आहे. तसेच फुलांचे, मातीचे आणि रंगीत दिवे व सजावटीच्या वस्तूही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सशक्तीकरणाच्या दिशेने प्रोत्साहन देणे हा आहे. या माध्यमातून महिलांच्या उद्यमशीलतेला चालना मिळून त्यांच्या व्यवसाय वृद्धीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
“दिवाळी फराळ व वस्तूंची खरेदी करून ग्रामीण महिलांना प्रोत्साहन द्या,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन स्वादिष्ट फराळाचा आनंद घ्यावा आणि ग्रामीण महिलांच्या प्रयत्नांना साथ द्यावी, अशी विनंती जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #ZillaParishad #UMED #DiwaliFaralFestival #WomenEmpowerment #SelfHelpGroups #RuralEntrepreneurship #GadchiroliNews #FaralMela #Handicraft #LocalProducts #SupportRuralWomen #Diwali2025 #GadchiroliDistrict #Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here