जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनी २६ डिसेंबरला ; पशुपालकांसाठी सुवर्णसंधी

33

जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनी २६ डिसेंबरला ; पशुपालकांसाठी सुवर्णसंधी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांसाठी दिलासादायक आणि मार्गदर्शक ठरणारी जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनी येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रदर्शनी गडचिरोली तालुक्यातील कनेरी (पारडी) येथे प्रियंका हायस्कूल समोरील शंकरपटाच्या मैदानावर संपन्न होणार आहे.
या प्रदर्शनीत गाय व म्हैस वर्ग, शेळी, कुक्कुट आदी विविध पशुधनाचा समावेश राहणार असून जिल्ह्यातील पशुपालकांना आपल्या पशुंची नि:शुल्क नोंदणी करून प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे. पशुपालन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित पशुसंवर्धन पद्धतींचा प्रसार आणि गुणवत्तापूर्ण पशुधनाला प्रोत्साहन देणे, हा या प्रदर्शनीचा मुख्य उद्देश आहे.
प्रदर्शनीच्या दिवशी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत पशुंची नोंदणी करण्यात येणार असून सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत उत्कृष्ठ पशुधनाची निवड केली जाणार आहे. या दरम्यान शेतकरी व पशुपालकांना मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उत्कृष्ठ पशुधनासाठी बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीत जिल्ह्यातील सर्व शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय गडचिरोली, डॉ. गणेश मेश्राम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here