– उपजिल्हा रुग्णालय एक महिन्यात लोकार्पणासाठी तयार ठेवण्याच्या सूचना
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अहेरी तालुक्यात आज दिवसभरात विविध विकास योजनांची, शासकीय यंत्रणांच्या कामकाजाची आणि पूरप्रवण भागांची पाहणी करत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध ठिकाणी भेटी देत प्रत्यक्ष आढावा घेतला आणि नागरिकांशी संवाद साधला. प्रशासनाने शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक कार्यक्षमतेने करून कामकाज गतिमान करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
सकाळी अहेरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात त्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प योजनेंतर्गत २०२४-२५ साठी दिल्या जाणाऱ्या निधीच्या वाटपाचाही आढावा घेतला. यावेळी लाभार्थी बचतगटांना ट्रॅक्टर खरेदीसाठी तसेच विटभट्टी साठी धनादेश वितरित करण्यात आले.
एकलव्य मॉडेल स्कूल अहेरी तसेच नागेपल्ली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी विद्यार्थ्यांना “चांगले शिका, तुम्हाला सर्व सुविधा युक्त शाळेत शिकण्याची चांगली संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ घ्या, अभ्यासात पुढे या आणि यशस्वी व्हा,” असे सांगत प्रेरित केले.
लगाम ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे सांगून हा रस्ता तातडीने पूर्ण करण्याचे व वन क्षेत्रातून जात असलेल्या महामार्गाकरिता आवश्यक परवानग्या वरिष्ठ पातळीवर तत्काळ निकाली काढण्याचे स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तत्पुवी गडचिरोली ते अहेरी या मार्गावर त्यांनी प्रत्यक्ष प्रवास करून राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची पाहणी केली व त्यासंदर्भात आढावा बैठकीत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपूर्ण रस्त्यांच्या कामासंदर्भात गुणवत्तेची तपासणी करण्याचे आदेश गुणनियंत्रण विभागाला त्यांनी दिले. रस्त्यांच्या तक्रारींचे निराकरण आणि लवकरात लवकर प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.
पूरप्रवण भागांची पाहणी करताना, जिल्हाधिकारी पंडा यांनी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नुकसान झालेल्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. पूरस्थितीमुळे प्रभावित भागात मदत व पुनर्वसन कार्य वेळेत आणि प्रभावीपणे होईल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे त्यांनी सुचवले.
नागेपल्ली येथील महाराजस्व अभियान शिबिरात, नागरिकांना विविध योजनांचा लाभ वाटप करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेतल्या व तातडीने सोडवण्यासाठी संबधित विभागांना निर्देश दिले.
येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्राणहिता कॅम्पला देखील भेट देऊन त्यांनी सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर वांगेपल्ली येथील जिल्हा परिषद शाळा आणि अहेरी येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय यांची पाहणी केली. रुग्णालयाचे उर्वरित काम एक महिन्याच्या आत पूर्ण करून लवकरात लवकर उद्घाटनासाठी तयार ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
स्थानिक लोकप्रतिनिधींशी देखील त्यांनी संवाद साधत त्यांच्याकडून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला मार्गदर्शन केले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी संजय आसवले, तहसीलदार बालाजी सोमवंशी, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) बाबासाहेब पवार, तसेच तालुकास्तरीयंत्रणेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews
