जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते ‘बाल २डी-ईको’ मशीनचे उद्घाटन ; २०० बालकांची तपासणी
– गडचिरोलीत हृदयरोगग्रस्त बालकांसाठी दिलासादायक पाऊल
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : जिल्ह्यातील हृदयरोगाच्या संशयित बालकांसाठी मोठा दिलासा ठरणारी अत्याधुनिक ‘बाल २डी-ईको’ तपासणी सुविधा आता जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. या सुविधेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते आज करण्यात आले. यानिमित्त आयोजित विशेष २डी-ईको तपासणी शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी पंडा यांनी ० ते १८ वर्षे वयोगटातील हृदयरोगाच्या संशयित बालकांच्या पालकांनी या आधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. जन्मत: असलेल्या हृदयरोगाचे वेळेवर निदान झाल्यास योग्य उपचार व शस्त्रक्रियेद्वारे बालकांचे निरोगी भविष्य घडविता येते, असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरबीएसके–डीईआयसी कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीत आढळणाऱ्या जन्मजात आजारांवर पुढील उपचार, तज्ञ सल्ला, विशेष चाचण्या तसेच शस्त्रक्रियेसाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील ‘जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र’ (डीईआयसी) द्वितीयस्तरीय संदर्भसेवा केंद्र म्हणून कार्यरत आहे. आवश्यकतेनुसार तृतीयस्तरीय उपचार व्यवस्थापनही येथे करण्यात येते.
आजच्या २डी-ईको तपासणी शिबिरात नागपूर येथील प्रसिद्ध बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद अंबदकर व त्यांच्या तज्ञ पथकाने सहभाग घेतला. या शिबिरात एकूण २०० बालके व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४१ बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले असून काही बालकांचा पुढील पाठपुरावा आवश्यक आहे. निदान झालेल्या बालकांच्या पालकांना तज्ञांकडून सविस्तर समुपदेशन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील नवनिर्मित इमारतीची पाहणी करून विविध विभागांना भेटी दिल्या व उपलब्ध आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. दुर्गम व आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात तज्ञ आरोग्य सेवा जिल्हा स्तरावरच उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पेंदाम तसेच डीईआयसी व्यवस्थापक प्रशांत खोब्रागडे यांच्या नियोजनात आरबीएसके सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र, जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर पार पडले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #DistrictAdministration #CollectorAvishyantPanda #ChildHealthcare #PediatricCardiology #2DEcho #HeartCareForChildren #RBSK #DEIC #NationalHealthMission #ChildHeartScreening #PublicHealth #HealthcareInitiative
#MedicalCamp #RuralHealthcare #TribalAreaHealthcare #GovernmentHospital #WomenAndChildHospital #EarlyDiagnosis
#HealthyFuture














