धानोरा : डुंबरसात्यांची भाजी बनली विषारी, एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा

5596

The गडविश्व
धानोरा, दि. २९ : धानोरा तालुक्यातील टवेटोला येथे जंगलातून आणलेल्या डुंबरसात्यांची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली. २७ जून रोजी सायंकाळी ही घटना घडली असून, सर्व रुग्णांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने सर्वांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
प्राप्त माहितीनुसार, टवेटोला गावातील नागरिकांनी जंगलातून डुंबरसात्या गोळा करून त्या स्वच्छ करून भाजी तयार केली. सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास जेवण झाल्यानंतर काही वेळातच संबंधित व्यक्तींना उलट्या, मळमळ व जुलाब यासारखे त्रास जाणवू लागले. रात्रीपर्यंत त्रास वाढल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ जून रोजी सकाळी आठ वाजता त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विषबाधितांमध्ये विद्या देवनाथ नैताम (३ वर्षे) व अक्षर देवनाथ नैताम (१० वर्षे) हे कनारटोला येथील असून, ते ललिता रामदास नैताम (४५ वर्षे), सपना रामदास नैताम (१६ वर्षे) आणि स्वप्नील रामदास नैताम (२६ वर्षे) – टवेटोला येथील आपल्या नातेवाईकांकडे पाहुणे म्हणून आले होते.
आरोग्य विभागाच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे गंभीर परिणाम टळले असून, सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेनंतर परिसरात काळजीचे वातावरण निर्माण झाले असून, जंगली अन्नपदार्थ वापरताना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

#टवेटोला #विषबाधा #डुंबरसात्या #धानोरा #गडचिरोली #ग्रामीणआरोग्य #वनअन्नसावधगिरी #BreakingNews #MaharashtraNews #LocalNews

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here