धानोरा : खड्ड्यामुळे दुचाकी अनियंत्रित, भीषण अपघातात चालक गंभीर जखमी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १७ : राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे आणखी एक गंभीर अपघात घडला असून खड्ड्यात दुचाकी अडकल्याने वाहन अनियंत्रित होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास गिरोला–दूधमाळा मार्गावर घडली.
रमेश निसार (वय ४५) असे जखमीचे नाव असून ते मुरूमगाव येथील स्व. रामचंद्र दखने विद्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ते नेहमीप्रमाणे आपल्या MH 33 AG 3543 क्रमांकाच्या स्कुटीने गडचिरोलीहून मुरूमगावकडे कर्तव्यावर जात होते. दरम्यान गिरोला–दूधमाळा दरम्यान रस्त्यावरील खोल खड्ड्यात दुचाकीचे चाक अडकल्याने वाहनाचा तोल गेला. दुचाकी फरपटत पुढे घसरली आणि चालक रस्त्यावर कोसळला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे संपर्क साधण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजबे यांनी तत्काळ रुग्णवाहिका पाठवून जखमीस प्राथमिक उपचारासाठी धानोरा येथे हलविले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














