धानोरा : बाजार चौकात ट्रक ड्रायव्हर मृतावस्थेत आढळला

123

– मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १६ : धानोरा शहरातील मध्यवर्ती बाजार चौकात १५ जून रोजी दुपारी एक ट्रक ड्रायव्हर मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीची ओळख संजय राम इकवाल ठाकूर (वय 48, रा. चवरोत, सीतामढी, बिहार) अशी पटली आहे. तो सुरजागड येथून लोहखनिज घेऊन छत्तीसगडकडे निघालेल्या सी.जी. 08 ए.यु. 6011 या क्रमांकाच्या ट्रकचा चालक होता. सदर ट्रक 6 जून रोजी धानोरा येथील कोर्टासमोर अचानक बंद पडल्याने तेव्हापासून त्या ठिकाणी उभा होता. मृत ड्रायव्हर एकटाच ट्रकमध्ये वास्तव्यास होता, अशी माहिती मिळाली आहे.
१५ जून रोजी बाजार ओट्यावर एक व्यक्ती बराच वेळ न हलता पडलेला असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. धानोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता सदर व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला. तपासाअंती मृत व्यक्ती हा आठवडाभरापासून त्या ठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचा चालक असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवून शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, बातमी लिहीपर्यंत मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट असून, याबाबतचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, एकट्या वाहनचालकांच्या दैनंदिन अवस्थेकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanoranews #gadchirolinews #gadchirolipolice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here