धानोरा : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध ठार

2

धानोरा : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध ठार
– मंडईहून परतताना दुर्दैवी घटना
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २६ : तालुक्यातील केहकावाही कक्ष क्रमांक ६७७ परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध ठार झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनपरिक्षेत्र पूर्व मुरूमगाव अंतर्गत येणाऱ्या उपक्षेत्र पूर्व मुरूमगावातील नियतक्षेत्र केहकावाही कक्ष क्र. ६७७ मध्ये बुध्दुसिंग नोहरू ऊसेंडी (वय अंदाजे ६३, रा. मुरूमगाव) यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. ऊसेंडी हे गावाकडे परतत असताना हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
२४ व २५ फेब्रुवारी रोजी मुरूमगाव येथे मंडईचे आयोजन करण्यात आले होते. मंडईनिमित्त ऊसेंडी हे बाजारासाठी गावात आले होते. बाजार आटोपून संध्याकाळी घरी परतत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून उसेंडी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
घटनास्थळी वनविभागाने तातडीने धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी धानोरा येथे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित कुटुंबाला त्वरित आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी गस्त वाढवून ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here