– भयभीत लोकांची सैरावैरा धावपळ, हत्तीच्या थैमानाने घरे उद्ध्वस्त
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.२५ : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरात सलग दुसऱ्या रात्री रानटी हत्तीने थैमान घालत बेलगाव गावात प्रवेश केला. २५ जुलै रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गावकरी जेवण आटोपून झोपण्याच्या तयारीत असताना मंदिरासमोरील मुख्य रस्त्याने रानटी हत्ती गावात घुसला आणि एकच गोंधळ उडाला.
हत्तीचा अचानक झालेला प्रवेश पाहताच नागरिकांनी घाबरून लहान मुलांना उचलून स्लॅबच्या घरांवर धाव घेतली. काहींनी झाडाझुडपांमध्ये लपून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. टॉर्चच्या प्रकाशात हत्तीला गावाबाहेर हुसकावण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले.
या धुमाकुळात पवन इंदलसिंग धालनिया यांच्या घराचे छप्पर उद्ध्वस्त झाले. महेंद्र प्यारेलाल लेडिया यांच्या घरातील तांदूळ, बीज धान्याची नासधूस करण्यात आली. पोलिस पाटील संतोष मालिया, तसेच शिवराज व शिवनाथ गावर यांच्या परसबागेतील केळीची झाडे नेस्तनाबूत झाली.
घटनेची माहिती मिळताच क्षेत्रसहायक पी. जी. देशपांडे यांनी वनविभागाच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने रानटी हत्तीस जंगलाच्या दिशेने हुसकावण्यात आले.
वनविभागाने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली.
सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनांमुळे मुरूमगाव परिसरात भीतीचे वातावरण गडद झाले असून, हत्तींच्या वारंवार होत असलेल्या हल्ल्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी ग्रामस्थांची तीव्र मागणी आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #हत्तीचा_कहर #गडचिरोली_घटना #धानोरा_समाचार #मुरूमगाव_धावपळ #वनविभाग_कारवाई #ग्रामीण_भीती #हत्तीचे_आक्रमण #शेतकऱ्यांचे_नुकसान #बेलगाव_हल्ला #जीवमुठीत #ElephantAttack #GadchiroliNews #MurumgaonIncident #DhanoraUpdate #WildlifeConflict #ForestDepartment #MidnightPanic #VillageTerror #CropDamage #HumanWildlifeConflict
