The गडविश्व
ता.प्र/धानोरा, दि. ०७ : धानोरा शहरात मंगळवार ६ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. स्टेट बँकेसमोर रुग्णवाहिकेला रस्ता देताना दुचाकी घसरल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. भगचंद माणिक लिलारे (वय २८) रा. पठारी, ता. किर्णापूर, जि. बालाघाट, छत्तीसगड असे मृत युवकाचे नाव असून, तो धानोरा येथील बांबू डेपोमध्ये दिवाणजी म्हणून कार्यरत होता.
अपघातावेळी भगचंद हा एमएच ४९-बीवाय ३१०६ क्रमांकाच्या दुचाकीने डेपोमधून खोलीकडे जात होता. यावेळी मुरूम गावाकडून येणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता देताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. महामार्गालगत जेसीबीने सुरू असलेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे गिट्टी उखडली गेली होती. त्यावरून दुचाकी घसरून तो थेट दगडावर कोसळला आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भगचंद आपल्या वडिलांसोबत धानोरा येथे राहात होता. त्याच्या पाठीमागे दीड वर्षांची मुलगी असून, अपघाताने पितृछत्र हरपल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महामार्गावरील हलगर्जीपणामुळेच निष्पाप युवकाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #accident )