The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज प्रत्यक्ष स्थळी जाऊन जागेची पाहणी केली. यामध्ये २७.५९ कोटींच्या प्रेक्षागृहाची उभारणी, मामा तलावाचे सौंदर्यीकरण आणि केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागेचा आढावा घेण्यात आला.
पाहणी दौऱ्यात नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, तहसीलदार संतोष आष्टीकर, अभियंता अंकुश भालेराव आदी उपस्थित होते.

प्रेक्षागृह उभारणीला गती
जिल्ह्यातील विद्यार्थी, कलाकार आणि स्थानिक सांस्कृतिक चळवळीसाठी आधारभूत ठरणाऱ्या ७५० आसन क्षमतेच्या आधुनिक प्रेक्षागृहासाठी शासनाने अर्थसंकल्पात २७.५९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. जिल्हाधिकारी पंडा यांनी संबंधित जागेची पाहणी करून काम लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
मामा तलाव होणार हेरिटेज स्पॉट
शहराच्या मध्यभागी असलेला मामा तलाव हा श्वास घेणारे हिरवे फुफ्फुस मानला जातो. याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी खाऊगल्ल्या, भव्य फूटपाथ, प्रकाशयोजना, फुलझाडांची लागवड, बाके, वॉकिन्ग ट्रॅक व स्वागतद्वार अशा सुविधांचा समावेश असलेले नियोजन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी पंडा यांनी कामे तातडीने पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश दिले.
केंद्रीय विद्यालयासाठी जागा अंतिम टप्प्यात
शहरातील केंद्रीय विद्यालयाच्या प्रस्तावित स्थळाची पाहणी करून तात्पुरत्या जागेची शक्यता तपासण्यात आली. लवकरच शाळेचे काम प्रत्यक्ष सुरू होणार असल्याचे संकेत या दौऱ्याने दिले आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews