The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांना साजेशी प्रेरणादायी घटना गडचिरोलीत साकारली गेली. सीमा बाजीराव मडावी व सतिश भैय्याजी कुसराम यांनी कोणताही धार्मिक विधी, पुजारी, देवपूजा किंवा हुंडा न घेता फुले-आंबेडकरी विचारांचा अंगीकार करत सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. सेमाना बायपास रोडवरील सृष्टी सेलिब्रेशन हॉल येथे पार पडलेल्या या साधेपणातील तेजस्वी सोहळ्याने उपस्थितांना समाजपरिवर्तनाचा प्रत्यय दिला.
विवाहाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते सुनिल कावळे यांनी केले, तर ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख यांच्या हस्ते विवाह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नवदाम्पत्याने सामाजिक समता, लैंगिक समानता आणि परस्पर सन्मानाची शपथ घेत वैचारिक ठामपणा दाखवला.
या सोहळ्याला कुसुमताई आलाम, एच. टी. भडके, रोहिदास राऊत, धर्मानंद मेश्राम, अॅड. सोनाली मेश्राम, उमेशदादा उइके, डॉ. महेश कोपुलवार यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा विवाह केवळ वैयक्तिक सोहळा न राहता, तो एक वैचारिक आंदोलन ठरला. समतेचे मूल्य केवळ उच्चारले गेले नाही, तर कृतीतून साकारले गेले. सत्यशोधक विवाह ही सामाजिक परिवर्तनाची गरज आहे, यावर उपस्थित मान्यवरांनी भर दिला. नवदाम्पत्याचा हा निर्णय समाजात नव्या शक्यतांची दिशा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #SatyashodhakMarriage #SocialReform #Equality #PhuleAmbedkarIdeology #SocialJustice #ProgressiveMarriage #Gadchiroli #MarriageWithoutDowry #ConstitutionalValues #AlternativeMarriage #GenderEquality #SocialChange #RationalMarriage
#सत्यशोधकविवाह #समाजपरिवर्तन #समता #फुलेआंबेडकरीचळवळ #सामाजिकन्याय #वैचारिकविवाह #गडचिरोली #समानतेसाठी #हूंडामुक्तविवाह #संविधानमूल्ये #सत्यशोधकचळवळ #विवाहातीलपरिवर्तन #सामाजिकचळवळ