देसाईगंज : काँग्रेसला मोठा धक्का; माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी व अधिवक्ता संघाचा राष्ट्रवादीत प्रवेश
– नगराध्यक्षपदासाठी सौ. निताताई संजय गुरु यांची उमेदवारी जाहीर
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, दि. ७ : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देसाईगंजमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, तसेच जेष्ठ अधिवक्ता संजय गुरु यांच्या नेतृत्वाखालील अधिवक्ता संघाने आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुलभाई पटेल, ना. इंद्रनील मनोहर नाईक (पालकमंत्री गोंदिया जिल्हा व राज्यमंत्री उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण), राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, तसेच सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
या कार्यक्रमातच सौ. निताताई संजय गुरु यांना देसाईगंज नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. निताताई गुरु या सामाजिक कार्यकर्त्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या सक्रिय महिला नेत्या म्हणून परिचित आहेत.
या प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार गट) साठी हा पक्षप्रवेश राजकीयदृष्ट्या “गेम चेंजर” ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














