The गडविश्व
चंद्रपूर, दि. २८ : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ३ पांढऱ्या गिधाडांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
राज्याच्या वन विभागाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जटायू हा रामायणातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून अवघ्या देशात गिधाडांची संख्या रोडावली असल्याने त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेता दहा महिन्यांपूर्वी २१ जानेवारी रोजी एक प्रयोग केला. हरयाणा राज्यातल्या पिंजोर येथील संशोधन केंद्रातील धोकाग्रस्त व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले अतिशय दुर्मिळ १० पांढरे गिधाड (जटायू) पक्षी ताडोबातील केंद्रात आणण्यात आले होते. या सर्व गिधाडांना प्रथम या वनक्षेत्राच्या वातावरणाची सवय व्हावी या हेतूने त्यांना येथे उभारण्यात आलेल्या ‘प्री-रिलीज एवेयरीमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. ४ जुलै रोजी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी या सर्व १० गिधाडांना ‘जीएसएम ट्रान्समिशन ट्रकिंग डिव्हाईस’ही लावले होते.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बोट्झरी येथील जंगलात एक मोठा पिंजरा तयार करून त्यात या १० गिधाडांना (जटायू) सोडले. तीन महिने तिथे राहिल्यानंतर त्यांना निसर्गमुक्त करण्यात आले होते. मात्र अचानक २७ नोव्हेंबर रोजी या तीन गिधाडांचा (जटायू) मृत्यू झाला. या तीन गिधाडांचा मृत्यू सारख्या कारणाने झाल्याचे कळते. या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविण्यात आल्याचेही माहिती आहे. नेमका कोणत्या कारणाने गिधाडांचा मृत्यू झाला याबाबत वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच कळणार आहे. सदर घटनेने वनविभागात मात्र खळबळ उडाली असून गिधाडांच्या संवर्धनाचा प्रश्न आता ऐरणीवर आल्याचे बोलण्यात येत आहे.

(#tadoba #thegdv #thegadvishva #chandrpur #tafoba andhari #forest #tadoba forest)