चक्रीवादळाचा रांगी परिसराला जबर तडाखा : मोठ्या प्रमाणात नुकसान

192

– नागरिकांची भरपाईची मागणी
The गडविश्व
ता.प्र /धानोरा, दि. १० : धानोरा तालुक्यातील रांगी परिसरात ९ जून रोजी सायंकाळी ७.३० ते ८.०० वाजताच्या सुमारास आलेल्या अचानक चक्रीवादळाने संपूर्ण गावात भीषण हाहाकार उडवून दिला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक घरांचे, शासकीय इमारतींचे, शाळांचे आणि शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
आकाशात अचानक दाट ढग जमले आणि काही क्षणातच जोरदार वारा सुटला. वाऱ्याचा जोर इतका होता की अनेक झाडे मुळासकट उपटली गेली, तर काही झाडे घरांवर, इमारतींवर, विद्युत तारांवर कोसळली. शासकीय आश्रमशाळेच्या किचन शेडवर एक मोठे मोहाचे झाड पडले असून जिल्हा परिषद शाळेतही झाड कोसळले आहे. अंगणवाडीच्या इमारतीवरही झाड कोसळल्यामुळे ती धोकादायक झाली आहे.
रांगी ते आरमोरी आणि रांगी ते धानोरा मार्गावरील अनेक झाडे व फांद्या रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. विद्युत तारा तुटून पडल्यामुळे आणि खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून, तो पुन्हा सुरू होण्यासाठी वेळ लागणार आहे. काही घरांची पत्रे उडाली असून आदिवासी सोसायटीच्या गोडाऊनवरील पत्रे उडून गेले असल्याने साठवलेल्या धान्याचेही नुकसान झाले आहे.
वादळाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत केले असून, स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे रस्त्यावरील झाडे तातडीने हटवण्याची आणि वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच, प्रशासनाने त्वरीत पंचनामा करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora #chakrivadal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here