– अपघात टळला पण संताप उफाळला
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ०८ : धानोरा शहरातील महामार्गाचे काम ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या जिवावर बेतू लागले आहे. ७ मे रोजी अंबिका वस्त्रालयाजवळ नव्याने लावलेला ‘जिवंत विद्युत खांब’ अचानक कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र संपूर्ण शहर हादरून गेलं आहे.
हा खांब रस्त्यालगत उभा करताना खड्डा नीट बुजविण्यात आलेला नव्हता. वादळी वाऱ्यांमध्ये खांब उन्मळून थेट दुकानावर कोसळला. पाहा कंत्राटदाराचा बिनधास्तपणा – पाया न करता खांब लावला, विद्युतप्रवाह सुरू केला, आणि लोकांचा जीव धोक्यात घातला.
या घटनेच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजे ६ मे रोजी, रुग्णवाहिकेला वाट देताना रस्त्यावरील दगडांवरून घसरून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. सततच्या अपघातांनी आणि बेजबाबदार कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे.
घटनेनंतर भाजपा अध्यक्ष साजन गुंडावार, राका शहर अध्यक्ष अभय इंदुरकर, व्यापारी नेते सारंग साळवे आणि महादेव गणोरकर यांनी तातडीने विद्युत प्रवाह बंद करण्याची मागणी करत प्रशासनाला जागं केलं.
“खड्डे उघडे, खांब उघडे, व्यवस्था ठप्प – अशी विकासकामं धानोऱ्याच्या जिवाशी का खेळत आहेत?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. अजूनही काही खांब वाकलेलेच आहेत, आणि त्यांच्यावर कोणतीही दखल घेतली जात नाही.
निव्वळ नशिब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला – पण पुढच्यावेळी जबाबदार कोण? संबंधित विभाग व प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
