चातगाव येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम

27

चातगाव येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम
– आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १४ : धानोरा तालुक्यातील चातगाव ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत लोकसहभागाचे उत्तम उदाहरण घालत 13 नोव्हेंबर 2025 रोजी वनराई साठवण बंधारा उभारला. ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, आरोग्य विभाग, महिला बचतगट तसेच गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या कार्यात सहभाग नोंदवत गावातील एकात्मता व विकासाबद्दलची बांधिलकी अधोरेखित केली.
या उपक्रमात ग्रामपंचायत चातगाव, पोलीस स्टेशन चातगाव, उपस्वास्थ्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी कारवफा, ‘उमेद’ अंतर्गत महिला बचतगट, तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी यांनी सक्रिय योगदान दिले.
दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालय परिसरात उपस्वास्थ्य केंद्र चातगावतर्फे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह आयुष्मान भारत कार्डसाठी स्वतंत्र स्टॉलचीही व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक काळभोर तसेच गटविकास अधिकारी वानखेडे यांनी उपस्थित राहून अभियानाच्या विविध निकषांची पाहणी केली. घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत या अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवण्याचा आमचा निश्चय आहे असे आश्वासन सरपंच गोपाल उईके यांनी व्यक्त केले.
सभा संपल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी रणजीत राठोड यांनी सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानत उपक्रमाच्या यशस्वितेचा गौरव केला.
चातगाव ग्रामस्थांच्या या उपक्रमाने “लोकसहभागातून विकास” ही संकल्पना पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here