‘घर घर संविधान’च्या घोषणेनिशी संविधान दिन उत्साहात
– आरमोरीत वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांना प्रतिसाद
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, दि. २६ : स्थानीय हितकारिणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘घर घर संविधान’ या घोषणेला प्रतिसाद देत विद्यालयाने विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संविधान मूल्यांची जागृती घडवली.
संविधान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यासोबतच विद्यार्थ्यांनी उद्देशिकेची प्रतिकृती हातात घेऊन शहरात जागरूकता फेरी काढली. संविधानातील मूलभूत तत्त्वे व नागरिकांच्या कर्तव्यांविषयी माहिती देत विद्यार्थ्यांनी जागृतीचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बहेकर होते. उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्रा. धुर्वे, प्रा. मेश्राम, प्रा. प्रधान, प्रा. शिलार आणि प्रा. कु. हेडाऊ यांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. कु. मेश्राम, प्रास्ताविक प्रा. दोनडकर, तर आभार प्रदर्शन प्रा. सहारे यांनी केले. विद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमांना विद्यार्थ्यांसह शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.














