– दक्षिण धानोरा वनपरिक्षेत्रात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. ०७ : “पर्यावरणाचे समतोल राखा, वनसंपत्तीचे रक्षण करा” या मूलमंत्राने सजलेला जागतिक पर्यावरण दिनाचा कार्यक्रम ५ जून २०२५ रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय दक्षिण धानोरा येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली.
कार्यक्रमास धानोरा येथील क्षेत्र सहाय्यक आर. एम. नरुले, येरकड येथील क्षेत्र सहाय्यक एस. के. डंकरवार तसेच संपूर्ण वनकर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी पुरमशेट्टीवार यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व विशद करून पर्यावरण समतोल राखण्याचे आवाहन केले. त्यांनी तस्कर हत्तींसंदर्भातील संभाव्य धोके लक्षात घेता गावागावात जनजागृती करून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले.
पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचवण्यासाठी विशेष बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे विविध गावांमध्ये फिरून पर्यावरण व वन्यप्राण्यांचे महत्त्व सांगण्यात आले. रॅलीचा समारोप धानोरा वनवसाहतीत वृक्षारोपणाने करण्यात आला. यामध्ये कडुनिंब, चिंच, आवळा, करंज, काशीद आणि बांबू अशा विविध प्रजातींचे रोपण करण्यात आले.
यानंतर धानोऱ्यापासून चार किलोमीटरवरील कांदाळी या आदिवासीबहुल गावातही रॅली पोहचली. “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे” या प्रेरणादायी घोषवाक्याने ग्रामस्थांमध्ये पर्यावरण संवर्धनाची साद घालण्यात आली. ग्रामस्थांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संपूर्ण कार्यक्रमातून पर्यावरण रक्षणाची आणि वनसंपत्ती संवर्धनाची महत्त्वपूर्ण जाणीव निर्माण झाली असून, हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात वनविभाग यशस्वी ठरला.
