– गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : देशातील आणि राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी भाजप युती सरकारकडून होत असलेली संवैधानिक मूल्यांची पायमल्ली, वाढती बेरोजगारी, महागाई, जातीय दंगली, शेतकरी–मजुरांचे प्रश्न आणि सत्तेचा दुरुपयोग या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने राज्यभरात जनजागृती करण्यासाठी ‘संविधान सत्याग्रह यात्रा’ आयोजित केली आहे.
ही पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत काढण्यात येणार आहे. यात्रेची सुरुवात २९ सप्टेंबर रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी येथून होऊन महात्मा गांधींच्या विचारांचे प्रतिक असलेल्या सेवाग्राम, वर्धा येथे २ ऑक्टोबर रोजी समाप्ती होणार आहे.
या यात्रेद्वारे संविधानिक मूल्यांचे संरक्षण, लोकशाहीचे रक्षण आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा उभारण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. यात्रेदरम्यान विविध ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात येणार असून शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला, युवक–युवती अशा सर्व घटकांपर्यंत काँग्रेस आपला संदेश पोहोचवणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक–तरुणी, शेतकरी, बुद्धिजीवी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत सहभागी होऊन लोकशाही मजबूत करण्यास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














