गडचिरोलीत उद्या काँग्रेसचा शेतकरी मेळावा आणि ‘शेतकरी न्याय पदयात्रा’

142

– हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसतर्फे गडचिरोली जिल्ह्यात उद्या १२ जून रोजी ‘शेतकरी मेळावा’ व ‘शेतकरी न्याय पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. अभिनव लॉन, गडचिरोली येथे दुपारी १२ वाजता मेळाव्याची सुरुवात होणार असून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत न्याय पदयात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.या आंदोलनात काँग्रेस विधिमंडळ नेते आ. विजय वड्डेटीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार प्रशांत पडोळे, खासदार बळवंत वानखेडे, अखिल भारतीय काँग्रेस सचिव कुणाल चौधरी,माजी खा. मारोतराव कोवासे,  आ.रामदास  मसराम ,आ.अभिजीत भाऊ वंजारी, आ. सुधाकर अडबाले सर ,निरीक्षक सचिन भाऊ नाईक, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी आदी वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
या शेतकरी मेळावा व पदयात्रेतून काँग्रेसने गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या अनेक दीर्घकालीन आणि तातडीच्या मागण्यांना आवाज देण्याचे ठरवले आहे. जिल्ह्यात वाढलेला वन्य प्राण्यांचा उपद्रव, नुकसान भरपाईची मर्यादा, अजूनही न मिळालेला बोनस, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, सोलर पंप व वीजजोडणीच्या अडचणी, सुपीक जमिनींचे अधिग्रहण, वनपट्ट्यांवरील सात पिढ्यांची अट, जड वाहतुकीमुळे होणारे अपघात, आरोग्य सुविधा, रोजगार व भरती प्रक्रिया, शासकीय योजनांची थांबलेली लाभवाटप प्रक्रिया, खरीपपूर्व बी-बियाण्यांचा तुटवडा आणि रस्त्यांची दुरवस्था आदी गंभीर प्रश्न यामध्ये अंतर्भूत आहेत.
शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ चर्चेत न राहता त्यावर ठोस निर्णय व्हावेत, शासनाची धोरणे ग्रामीण व शेतीप्रधान जिल्ह्यांच्या हिताला पूरक असावीत यासाठी ही न्याय पदयात्रा आणि मेळावा घेतला जात असून जिल्ह्यातील सर्व शेतकरी, युवक, महिला व नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here