– पावसामुळे पिकांचे नुकसान, बोगस बियाणे आणि खत टंचाईवर तातडीने उपाय न झाल्यास आंदोलनाची तयारी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नैसर्गिक संकटांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर “घंटा नांद आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दुबार पेरणीसह बोगस बियाण्यांचा सुळसुळाट आणि खतांच्या टंचाईने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ब्राह्मणवाडे यांनी सांगितले की, अनेक शेतकऱ्यांचे धान, कपाशी यासह अन्य पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले असून काहींच्या जमिनीत बियाणे उगवण्याआधीच कुजले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा खर्च लादला गेला आहे. अशा परिस्थितीत शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी आणि मोफत दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांनी बोगस बियाणे विक्रीसाठी जबाबदार असणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. याशिवाय, खत विक्रीत होत असलेल्या ‘लिंकिंग’ प्रथेमुळे शेतकऱ्यांना इतर वस्तूंवर जबरदस्तीने खर्च करावा लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
ब्राह्मणवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करताना म्हटले की, पालकमंत्री असूनही त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या दुर्लक्षित केल्या आहेत.
या सर्व मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी “घंटा नांद आंदोलन”च्या माध्यमातून रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #गडचिरोली #शेतकरीआंदोलन #घंटानांदआंदोलन #महेंद्रब्राह्मणवाडे #काँग्रेस #पिकांचेनुकसान #बोगसबियाणे #खत्तंचाई #पेसाकायदा #गडचिरोलीशेती #राजकीयआंदोलन
#Gadchiroli #FarmersProtest #GhantaNandAndolan #MahendraBrahmanwade #Congress #CropDamage #FakeSeeds #FertilizerShortage #AgriculturalCrisis #PoliticalProtest