कुरखेडा तालुक्यात थंडीचा कडाका वाढला ; सायंकाळी पारा १२.२ अंशांवर

5

कुरखेडा तालुक्यात थंडीचा कडाका वाढला ; सायंकाळी पारा १२.२ अंशांवर
– गावागावांत शेकोट्या पेटल्या
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १८ : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात हिवाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत घसरत असलेल्या तापमानाने आज सकाळी १९ अंशांची पातळी गाठली, तर सायंकाळी पारा १२.२ अंशांवर घसरल्यामुळे लोकांना तीव्र थंडीचा अनुभव आला.
कढोली, मालेवाडा, अंगारा आणि नदीकाठावरील गावांमध्ये सकाळच्या सुमारास दाट धुके पसरले होते. थंड वाऱ्यामुळे सामान्य नागरिकांपासून ते जंगल परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांपर्यंत सर्वांनी उबदार कपड्यांचा वापर वाढवला आहे. हातपाय गोठवणाऱ्या थंडीमुळे लोक स्वेटर, शाल आणि कानटोपी घालून बाहेर पडताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी सकाळ-संध्याकाळ शेकोट्या पेटवून त्यावर ताप घेणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस तापमानात आणखी १ ते २ अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील शाळांनी विद्यार्थ्यांना उबदार कपडे घालून येण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. वाढलेल्या थंडीचा प्रभाव पाहता ग्रामीण भागात रात्रीच्या जेवणानंतर शेकोटीभोवती बसून गप्पा रंगवण्याचे दृश्यही सर्वत्र दिसून येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here