धुळीच्या त्रासाने नागरिक त्रस्त ; नवेगावात महिलांचे रास्ता रोको
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : गडचिरोली जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या नवेगाव (मूरखळा) येथे अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड धुळीने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. उपसा माती भरण्याच्या कामासाठी सुरू असलेल्या डंपर व ट्रकच्या ये-जामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
धुळीच्या त्रासाला कंटाळून संतप्त महिलांनी थेट रस्त्यावर उतरून डंपर व ट्रकची वाहतूक रोखत रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अवजड वाहनांचा वेग अधिक असून वाहन गेल्यानंतर प्रचंड प्रमाणात धूळ उडते. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध व महिलांना बसत असून खोकला, श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत.
नवेगाव बसस्टँड ते सेमाना रोड गेल्या अनेक दशकांपासून कच्चाच असून आजतागायत रस्त्याचे डांबरीकरण अथवा सिमेंट काँक्रिटीकरण झालेले नाही. पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ, अशी स्थिती कायम असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.
धूळ नियंत्रणासाठी नियमित पाण्याचा मारा, अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण, रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तसेच कचरा संकलन तातडीने सुरू करावे, अशी जोरदार मागणी महिलांसह ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














