– ६८ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराद्वारे पुनर्वसन
The गडविश्व
कोनसरी, दि. १५ : गडचिरोलीत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६० माओवाद्यांनी सशस्त्र आत्मसमर्पण केले असून, या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) या कंपनीचे विशेष कौतुक केले.
एलएमईएलने महाराष्ट्र शासन आणि गडचिरोली पोलिसांच्या समन्वयाने आतापर्यंत ६८ आत्मसमर्पित माओवाद्यांचे तसेच माओवादी हिंसाचारग्रस्त कुटुंबातील १४ सदस्यांचे असे एकूण ८२ व्यक्तींचे कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराद्वारे पुनर्वसन केले आहे. हे सर्व कर्मचारी कंपनीच्या प्रशासन, नागरी कामे, यांत्रिक परिचालन व बांधकाम विभागात कार्यरत आहेत.
औपचारिक शिक्षण मर्यादित असलेल्या आत्मसमर्पितांसाठी कंपनीने कौशल्याधारित पुनर्वसन मॉडेल तयार केले असून, कोनसरी येथील लॉयड्स स्किल डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रशिक्षण देऊन त्यांना कार्यक्षम बनविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचे पुनर्वसन करीत आहोत. लॉयड्स मेटल्सने यापूर्वी अशा माओवाद्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी आश्वासन दिले आहे की इच्छुक आत्मसमर्पितांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिले जाईल,”
असे त्यांनी गडचिरोली पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सांगितले.
लॉयड्स मेटल्स कंपनी एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज खाणीचे संचालन करते, तर कोनसरी येथे DRI व पेलेट प्लांट स्थापन करून औद्योगिक विस्तार साधला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याच ठिकाणी २२ जुलै २०२५ रोजी कंपनीच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. या प्रकल्पांतर्गत ८७ किलोमीटर लांबीच्या स्लरी पाइपलाइन आणि लोहखनिज ग्राइंडिंग युनिटचे उद्घाटन करण्यात आले आहे.
व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने स्थानिक रोजगार आणि कौशल्यविकासावर भर दिला असून, एल.टी. गोंडवाना स्किल हब प्रा. लि. च्या माध्यमातून १,४०० स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या देखील शेकडो युवक विविध कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शासन, उद्योग आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे गडचिरोलीत विश्वास, स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचे नवे वातावरण निर्माण झाले आहे.
एकेकाळी औद्योगिक विकासासाठी आव्हान मानला जाणारा हा जिल्हा आता समावेशक आणि शाश्वत विकासाचे केंद्र म्हणून उदयास येत असून, स्थानिक युवकांसह आत्मसमर्पित माओवाद्यांना नवजीवनाची आणि आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध करून देत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














