चारभ‌ट्टी एक प्रेरणादायी आदिवासी गाव ; ग्रामस्थ व मुक्तीपथच्या प्रयत्नातून दारूबंदी

274

The गडविश्व
गडचिरोली / कुरखेडा, दि. २१ : कुरखेडा शहरापासून चारभट्टी हे गाव १४ किलोमीटर अंतरावर आहे. चारभ‌ट्टी गट ग्रामपंचायत अंतर्गत चारभ‌ट्टी, सिदेसुरः पौठेसुर व कोटलडोह या चार गावांचा समावेश आहे. ९० टक्के दारूविक्री होणाऱ्या गावातून दारूविक्री हद्दपार करण्याचे यशस्वी प्रयत्न मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी करून दाखविले आहे. या आदिवासीबहुल गावापासून प्रेरणा घेत कुरखेडा तालुक्यातील अनेक गावांनी आपल्या गावात दारूबंदी लागू केली आहे.
चारभ‌ट्टी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेत वर्ग १ से वर्ग ४ पर्यंतच शिक्षण घेण्याची सुविधा आहे. चारभ‌ट्टी या गावाची एकूण लोकसंख्या १२४८ एवढी आहे. गावात १३ छोटे छोटे किराणा दुकान आहेत. गावात ३ अंगणवाडी आहेत. या गावात ९०% आदिवासी समुदाय असून ५% इतर मागासवगीय व ५% अनुसूचित जातीचे समुदाय राहतात. या गावात दारुबंदीचा ठराव घेण्यापूर्वी गावातील जवळपास ९० टक्के घरात मोह फुलांची दारू काढणे, पिणे व विकणे असे गावाचे एकंदरीत वातावरण होते. कारण आदिवासी समुदायाची अशी धारणा आहे की. आदिवासी संस्कृतीत त्यांच्या देवाला मोहाच्या दारुचा नैवेद्य ‌द्यावा लागतो. सुखद व दुःखद प्रसंगी मोहाची दारू तयार करून पिणे व पूर्वजांना सुद्धा दारुचा नैवेद्य ठेवणे हे आदिवासी संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आणि कायद्‌यानुसार त्यांना मोहाची दारु पिण्याचा अधिकार आहे. यामुळेच आदिवासी समुदायामध्ये मोहाची दारु पिण्याचे प्रमाण खूपच जास्त दिसून येते. येथील लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे. गावातील जवळपास ८०% लोकांकडे पशुधन आहे. परंतु शेती तसेच पशुधनातून पाहिजे तेवढे उत्पन्न गावातील लोकांना मिळत नाही. धान रोवणीला जाणे, धान कापणी व दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून आपले उदरनिर्वाह येथील लोक करतात. हे गाव रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण आणि रोजगार व स्वयंरोजगार याबाबत अतिशय मागासलेले आहे.
या गावात दारूबंदी लागू करण्यासाठी मुक्तीपथ तालुका चमूने सप्टेंबर २०२३ पासून सातत्याने प्रयत्न सुरू केले. मुक्तिपथ चमू ने गावातील लोकांना दारूच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती देऊन गावातील दारुबंदी करण्याचे कायदे व मार्ग समजावून सांगितले. गावातील दारुबंदीसाठी गावात ग्रामपंचायत कार्यालयात गावकऱ्यांनी एकत्रित बैठक आयोजित करून गावातील लोकांमधूनच दारूबंदी समिती तयार करून बहुमताने दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. गावात दारूबंदी लागू करावी, कोणीही दारू विक्री करेल तर त्याला मोठा आर्थिक दंड लावणे, दंड वसूल करणे, दंड न भरल्यास आकारलेल्या दंडा एवढी मालमता जप्त करणे, ग्रामपंचायत कार्यालयाकडून मिळणारे विविध दाखले, कागदपत्रे बंद करणे याबाबत सविस्तर माहिती दिली. दिनांक 1 जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात सभेचे आयोजन करण्यात आले. या गावसभेस तंटामुक्त अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावातील महिलामंडळ सुद्धा उपस्थित होते. या सभेमध्ये चारभ‌ट्टी या संपूर्ण गट ग्रामपंचायत मध्ये दारूबंदीचा ठराव बहुमताने घेण्यात आला. एवढेच नाही तर अतिशय काटेकोरपणे गावातील दारुबंदीची अंमलबजावणी सुद्धा सुरु केली. या गावात दारूबंदी लागू केल्यापासून गावातील वातावरण अतिशय शांतिपूर्ण दिसून येते. या गावातील सर्व समुदायाकडून मुक्तीपथ टीमला सहकार्य व प्रेम मिळत आहे.

ग्रामस्थांनी मांडली व्यस्था

चारभ‌ट्टी या गावातील अनेक तरूण दारूच्या आहारी गेल्यामुळे व्यसनी तरुणासोबतच त्यांच्या कुटुंबीयांनी सुद्‌धा दारूमुळे होणारे विविध दुष्परिणाम, वेदना प्रत्यक्ष भोगल्या व अनुभवल्या होत्या. दारूच्या व्यसनामुळे काही तरुण युवकांचा जीव सुद्धा गेला आहे. त्यामुळे काही कुटुंब उद्‌ध्वस्त सुद्धा झाले आहे. गावातील पुजारी यांच्या तरूण मुलाचा जीव सुद्धा दारूच्या व्यसनामुळे गेला हे सांगताना पुजारी यांचे डोळे पाणावले होते. आम्ही वयस्कर गृहस्थ दारू प्यायची, पण आता आमचे मुल दारूच्या आहारी गेलेले पाहून आम्हाला खूपच दुःख वाटते. अशी व्यथा मांडत आमच्या गावातील दारूबंदीसाठी आम्हाला मार्ग सांगावा व गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्याबाबत आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मागणी मुक्तिपथ चमूकडे गावकऱ्यांनी केली.

विविध गावांमधे सकारात्मक बदल

चारभ‌ट्टी या गावातील दारुबंदी पाहून कुरखेडा तालुक्यातील गरगडा व बिजापूर या १००% आदिवासीबहुल गावांनी सुद्‌धा स्वयंप्रेरणेने गावात दारूबंदी लागू केली. तसेच गुरनोली या गावामध्ये सुद्धा दारूबंदीचा ठराव मुक्तिपथ तालुका चमुच्या उपस्थितीत घेण्यात आला. चारभ‌ट्टी सारख्या आदिवासीबहुल गावातील लोक संघटन तयार करून गावात दारुबंदी लागू करू शकतात तर तुम्ही तुमच्या गावात संघटन तयार करून दारूबंदी का करू शकत नाही असे जेव्हा मुक्तीपथ टीमने इतर गावांमध्ये भेटीदरम्यान सांगितले. तेव्हा गावक-यांमध्ये सकारात्मक बदल पाहावयास मिळाला. एकंदरीत चारभ‌ट्टी हे गाव आता मुक्तिपथ चमूला इतर गावातील दारूबंदीसाठी अतिशय प्रेरणादायक सिद्ध होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here