– शेतजमिनीच्या मोजणीसाठी १ लाखाची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा (चेतन गहाणे), दि.०७ : शेतजमिनीचा पोटहिस्सा मोजून सातबारा वेगळा करून देण्यासाठी तब्बल १ लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार कुरखेडा येथील भूमी अभिलेख कार्यालयात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्यालय सहायक रवींद्र सदाशिव दिनकोंडावार (वय ४२) यांना गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.
सदर प्रकरणात तक्रारदाराने शासकीय कामासाठी लाच मागितल्याची तक्रार गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. त्यानुसार ५ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी दिनकोंडावार यांनी १ लाख रुपयांची लाच मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी सापळा रचून तडजोडीअंती ७० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.
सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीयपणे पार पाडली. अटक करण्यात आलेल्या दिनकोंडावार यांच्या राहत्या घरीही झडती घेण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत सफौ सुनील पेददीवार, पोहवा राजेश पदमगिरीवार, किशोर जौजांरकर, स्वप्नील बांबोळे, संदीप उडान, प्रविण जुमनाके, हितेश जेटटीवार, विद्या मशाखेत्री, जोत्सना वसाके, राजेश्वर कुमरे, चापले आदी अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
दरम्यान कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी व्यक्तीने लाच मागितल्यास, नागरिकांनी तत्काळ अँटी करप्शन ब्युरो, गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा. अशी लाचखोरी सहन न करता थेट तक्रार नोंदवावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांनी यावेळी केले.
#thegadvishva #thegdv #gadchiroli #gadchirolipolice #acb #AntiCorruption #BriberyCase #CaughtRedHanded #GadchiroliNews #Kurkheda #LandRecordsCorruption #ACBTrap #MaharashtraNews #GovernmentCorruption #ACBGadchiroli #FightCorruption #लाचखोरी #लाचलुचपत #गडचिरोलीबातमी #कुरखेडा #सरकारीभ्रष्टाचार #भूमीअभिलेख #एसीबीकारवाई #लाचखोरगजाआड #महाराष्ट्रबातम्या #गडचिरोली #भ्रष्टाचारविरोधी
