गडचिरोलीत भाजपने भाकरी फिरवली : नव्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब - प्रणोती निंबोरकरांचे नामांकन दाखल

23

The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत भाजपने मोठा राजकीय निर्णय घेत ‘भाकरी फिरवत’ नव्या चेहऱ्यावर स्पष्टपणे विश्वास ठेवला आहे. जुन्या दिग्गजांना मागे सारत पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्या नावावर अंतिम शिक्का मारला. आज नामांकनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी औपचारिकपणे आपला अर्ज दाखल करत निवडणूक लढतीची सुरूवात केली.
नामांकनावेळी शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताकदीचे प्रदर्शन केले. जयघोष, फटाके आणि उत्साहाच्या लाटेमुळे नगरपालिका कार्यालय परिसर राजकीय जल्लोषाने गजबजून गेला. मागील आठ–दहा दिवसांपासून दोन–तीन जुन्या नेत्यांची नावे तगडी चर्चेत असली, तरी ऐनवेळी पक्षाने ‘नव्या रक्ताला’ संधी देत सर्व समीकरणे बदलून टाकली.
भाजपने विधानसभा निवडणुकीत जसा ‘नवा चेहरा–नवी ऊर्जा’ हा फॉर्म्युला वापरून यश मिळवले, त्याच पद्धतीची रणनीती आता नगर परिषदेसाठी राबवल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळांमध्ये भाजपची ही चाल आक्रमक भूमिका दर्शवणारी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
नामांकनानंतर बोलताना प्रणोती निंबोरकर यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजा, महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देण्याचा विश्वास व्यक्त केला. “गडचिरोलीला शाश्वत आणि पारदर्शक प्रशासन देणे हीच माझी प्राथमिकता असेल,” असे त्यांनी सांगितले.
भाजपने जुन्यांना ‘डावलून’ नव्या चेहऱ्याला संधी दिल्याने गडचिरोलीतील निवडणूक अधिकच रोचक होणार असून, पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #BJP #MayorElection #NewCandidate #PranotiNimborkar #PoliticalUpdate #MunicipalElection #BreakingNews #MaharashtraPolitics #BJPStrategy

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here