कुरखेडा वनपरिक्षेत्रात पक्षी सप्ताह उत्साहात साजरा
– विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षणाचा अनोखा अनुभव
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : पक्षी हे पर्यावरणातील संतुलन राखणारे निसर्गाचे अविभाज्य घटक असून त्यांचे संवर्धन ही सर्वांचीच जबाबदारी आहे. या भावनेतून कुरखेडा वनपरिक्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही पक्षी सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. ५ ते १२ ऑक्टोबर दरम्यान आयोजित या सप्ताहात शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
कुरखेडा नियत क्षेत्रातील स्व. हरबाजी सोनकुसरे विद्यालय तळेगाव, जिल्हा परिषद शाळा जांभुळखेडा आणि जिल्हा परिषद शाळा डूटीटोला येथे पक्ष्यांचे पर्यावरणातील योगदान, त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व आणि वन्यप्राण्यांपासून बचावाच्या पद्धती या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वाघ, बिबट, अस्वल व हत्ती यांसारख्या वन्यप्राण्यांपासून सुरक्षित राहण्यासाठीच्या उपाययोजना व्हिडिओद्वारे दाखविण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले तळेगाव तलावातील पक्षी निरीक्षण. दुर्बिणीतून विविध पक्ष्यांचे निरीक्षण करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहल स्पष्ट दिसत होते. शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
हा उपक्रम वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. गोपुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमात क्षेत्र सहाय्यक एस. एल. कंकलवार, वनरक्षक एस. डब्ल्यू. गुनाडे, एम. के. दुधबळे (वडेगाव), एस. एन. वालदे (जांभुळखेडा) आणि विकी गोबाडे (वनमजूर) यांनी सक्रिय भूमिका बजावली.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पक्षी संवर्धनाबाबतची जागरूकता निर्माण झाली असून, अशा जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून वन विभाग ग्रामीण भागातील बालमनात पर्यावरण संवर्धनाची बीजे रोवित आहे. वन विभागाने पुढील काळातही असे उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice














