– २२५ पक्षी जप्त, गुन्हा दाखल
The गडविश्व
सावली, दि. ७ : वन्यजीव व पक्षी संरक्षणासाठी साजऱ्या होत असलेल्या पक्षी सप्ताहातच पक्ष्यांची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्र, नियतक्षेत्र सिर्सी येथील उमरी लगतच्या तलाव परिसरात रेशाळ कंठाची भिंगरी (Streak-throated Swallow) या संरक्षित प्रजातीच्या पक्ष्यांची शिकार करताना गडचिरोली जिल्ह्यातील चार शिकारींना वनविभागाने रंगेहात पकडले.
ही कारवाई वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं ऐतिहासिक ठरली असून, वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शिकाऱ्यांच्या बेफिकीरीने वनविभागाला सतर्क केले आहे.
अटकेत करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लोमेश धोंडू गेडाम (३४), प्रताप बालाजी जराते (४५), अरविंद धोंडू गेडाम (३३) आणि मुखरू सखाराम मेश्राम (६५), सर्व रा. पारडी, जि. गडचिरोली यांचा समावेश असून त्यांच्या ताब्यातून शिकारीत वापरलेले साहित्य आणि २२५ मृत पक्षी असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त वस्तूंमध्ये ८ जाळ्या, ५ थैल्या, ९ नायलॉन दोरीचे बंडल, १६ बांबू काठ्या, ८ लाकडी खुंट्या तसेच दोन मोटारसायकली (CB Shine MH-33/X-0113 आणि Bajaj Discover MH-33/L-3165) यांचा समावेश आहे.
दरम्यान, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, ३९, ४९, ५०, ५१ नुसार आरोपींवर गुन्हा क्र. 204/232851/2025 दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत सावली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, वनक्षेत्र सहाय्यक अनंत राखुंडे, वनरक्षक महादेव मुंडे, भोलेश्वर सोनेकर, एकनाथ खुडे, आर. एस. डांगे तसेच स्थानिक पीआरटी चमू व बिट मदतनीस यांचा समावेश होता.
पुढील तपास विभागीय वनाधिकारी राजन तलमले आणि सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #WildlifeProtection #BirdWeek #Gadchiroli #SavliForestRange #PoachingCase #ForestDepartmentAction #WildlifeCrime #StreakThroatedSwallow #BirdConservation #MaharashtraNews #ForestOfficers #WildlifeAwareness #PoacherArrested #EnvironmentalProtection #NatureConservation














