राजकीय क्षेत्राला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा गिताताई हिंगे यांचा भीषण अपघातात मृत्यू

15

राजकीय क्षेत्राला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा गिताताई हिंगे यांचा भीषण अपघातात मृत्यू
– नागपूर–गडचिरोली प्रवासात घडली दुःखद घटना
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : नागपूर–गडचिरोली महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात गडचिरोली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तसेच आधारविश्व फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. गिताताई हिंगे यांचे दुर्दैवी निधन झाले. पाचगावजवळ मध्यरात्री सुमारे 12.30 वाजता त्यांच्या चारचाकी वाहनाला झालेल्या जबर धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्या. तर त्यांचे पती आणि वाहन चालकाला गंभीर दुखापत होऊन तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती आहे.
गिताताई हिंगे या ऊर्जावान, कुशल संघटिका म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध होत्या. काहीच दिवसांपूर्वी नगर परिषद निवडणूक दरम्यान त्यांनी भाजपला रामराम करीत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची थेट महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणून निवड झाली. महिलांच्या प्रश्नांवर त्यांच्या कामकाजामुळे त्यांना मोठा लौकिक मिळाला होता.
7 डिसेंबर रोजी त्या आपल्या पतीसह नागपूरवरून गडचिरोलीला परतत असताना पाचगाव नजीक झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले. जोरदार धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून घटनास्थळीच गिताताईंचा मृत्यू झाला. जखमी पती व चालकावर उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेची वार्ता समजताच गडचिरोली शहरात शोकमय वातावरण निर्माण झाले. विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त होत असून ‘ एक प्रभावी व प्रेरणादायी नेतृत्व हरपले’ अशा भावना उमटत आहेत. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, या अपघाताबाबत स्थानिकांमध्ये कुजबुज सुरू असून दुर्घटना नेमकी कशामुळे घडली यावर संशयाचे सावट कायम आहे. पोलिस तपास सुरू आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #NagpurGadchiroliHighway #RoadAccident #FatalAccident #GeetaHinge #NCP #NCPWomenWing #PoliticalNews #BreakingNews #MaharashtraNews #GadchiroliNews #MidnightAccident #HighwayCrash #TragicDeath

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here