गडचिरोलीत माओवादी चळवळीला मोठा धक्का : चकमकीत चार जहाल माओवादी ठार

55

The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : भामरागड तालुक्यातील कवंडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत गडचिरोली पोलिस व सीआरपीएफच्या संयुक्त माओवादीविरोधी अभियानात चार जहाल माओवादी ठार झाले. या माओवाद्यांवर एकूण १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. चकमकीनंतर घटनास्थळी एक एस.एल.आर., दोन .३०३ रायफल्स, एक भरमार बंदूक, वॉकीटॉकी व माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई ३६ तास चाललेल्या कठीण अभियानानंतर करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे सी-६० कमांडो व सीआरपीएफच्या ११३ बटालियनच्या डी कंपनीचे पथक २२ मे रोजी जंगलात रवाना झाले. २३ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास इंद्रावती नदीलगतच्या जंगलात शोधमोहीम राबवताना माओवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तर देत सुरक्षिततेसाठी गोळीबार केला. दोन तास चाललेल्या चकमकीनंतर चार माओवादी ठार झाले.
ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख पुढीलप्रमाणे झाली असून सन्नु मासा पुंगाटी (३५), रा. कवंडे, भामरागड – भामरागड दलम कमांडर, ८ लाखांचे बक्षीस, ३ गंभीर गुन्हे. अशोक ऊर्फ सुरेश पोरीया वड्डे (३८), रा. कवंडे – दलम सदस्य, २ लाखांचे बक्षीस, १७ गुन्हे. विज्यो ऊर्फ विज्यो होयामी (२५), रा. पोडीया, गंगालूर (छत्तीसगड) – दलम सदस्य, २ लाखांचे बक्षीस, १२ गुन्हे. करुणा ऊर्फ ममीता ऊर्फ तुनी पांडू वरसे (२१), रा. गोंगवाडा – दलम सदस्य, २ लाखांचे बक्षीस, ९ गुन्हे.
सदरचे माओवादविरोधी अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल, कमांडंट 113 बटा. सिआरपीएफ जसवीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-60 आणि सिआरपीएफ 113 बटा. डी कंपनीच्या जवानांनी यशस्वीपणे पार पाडले.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या शौर्यपूर्ण कामगिरीचे कौतुक करत माओवादीविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या चार वर्षांत गडचिरोली पोलिसांनी ८७ माओवादी चकमकीत ठार केले असून १२४ अटकेत घेतले असून ६३ जणांनी आत्मसमर्पण केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील माओवादी हालचालींना मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here