– मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्याचा विकास रोखण्यासाठी हेतुपुरस्सर ‘आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत’, ‘मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात आहे’ अशा अफवा पसरविल्या जात आहेत. अशा अफवांपासून सावध राहा. खोट्या प्रचाराला बळी न पडता जिल्ह्याच्या विकासात सहभागी व्हा, असे स्पष्ट आणि ठाम आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या भव्य कार्यक्रमात जिल्ह्याच्या औद्योगिक परिवर्तनाचे दर्शन घडले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की जिल्ह्यातील कच्चा माल बाहेर नेऊन इतरत्र उद्योग उभारण्याऐवजी, तो इथेच प्रक्रिया करून स्थानिकांना रोजगार मिळेल अशा शाश्वत पद्धतीने प्रकल्प उभारले जात आहेत. जिल्ह्याला वसाहतीसारखा वापरण्याचा आमचा हेतू नाही, तर स्थानिकांच्या हक्कांचे रक्षण करत त्यांच्याच सहभागातून विकास करायचा आहे.
यावेळी राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पद्मश्री पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या तुलसी मुंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे १४ हजारहून अधिक स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यामध्ये महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात १२ ते ५५ हजार रुपये मासिक पगाराच्या नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कुटुंबांचे अर्थकारण सक्षम होत आहे. आज इथल्या आदिवासी, युवक आणि महिलांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. केवळ रोजगार नाही, तर कौशल्य विकास, स्वाभिमान, आणि विकासाचा अनुभव स्थानिकांना मिळतो आहे, ही खरी प्रगती आहे.
प्रकल्पाच्या माध्यमातून ८५ किलोमीटर लांबीची स्लरी पाइपलाईन उभारली जात आहे. ही पाइपलाईन देशातील चौथ्या क्रमांकाची असून, पर्यावरणपूरक असून जलसंधारण व कार्बन उत्सर्जन नियंत्रणात उपयोगी ठरणार आहे. या प्रकल्पात कोणतेही प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की यापूर्वी माओवादी बंदुकीच्या जोरावर भीती निर्माण करून जिल्ह्याचा विकास रोखत होते. आज त्यांना मोठ्या प्रमाणात पाठीमागे हटावे लागत आहे. मात्र, आता काही शहरी माओवादी ‘जमिनी हिसकावल्या’, ‘जंगलतोड’ झाल्याच्या अफवा पसरवून लोकांचा संभ्रम निर्माण करत आहेत. या अफवांचा उद्देश गडचिरोलीच्या प्रगतीला खीळ घालण्याचा आहे. अशा शक्तींना वेळीच ओळखा आणि सावध राहा, असे त्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्याचा खरा विकास सुरू झाला आहे. या विकासाच्या प्रक्रियेला अफवांमुळे खंड पडू देऊ नका. जिल्ह्याच्या उज्वल भविष्यासाठी सरकार कटिबद्ध असून, सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, की मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस दरवर्षी गडचिरोलीमध्येच साजरा होतो, हेच त्यांच्या जिल्ह्याबद्दल असलेल्या आत्मीयतेचे उदाहरण आहे. जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणात मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रातील आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये गणला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेचा त्यांनी उल्लेख केला. गडचिरोली जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढवलं जात असून, पुढील पाच वर्षांत गडचिरोली इतर जिल्ह्यांपेक्षा पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. विकासाच्या या प्रवाहात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून प्रकल्पातून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती दिली. या कार्यक्रमाला माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, रमेश बारसागडे, प्रशांत वाघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #GadchiroliDevelopment #CMFadnavis #IndustrialTransformation #StopFakeNarratives #TribalEmpowerment #GreenIndustry #UrbanNaxalExposed #LloydsMetals #EmploymentGeneration #SustainableGrowth
#गडचिरोलीविकास #मुख्यमंत्रीफडणवीस #औद्योगिकगडचिरोली #जंगलतोडअफवा #शहरीमाओवादी #आदिवासीहक्क #एलएमईएल #गडचिरोलीरोजगार #ग्रामविकास #महाराष्ट्रउद्योग
