– शहरात खळबळ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ९ : गोहत्या व गोमांस विक्री करणे कायद्याने गुन्हा असून, छुप्या मार्गाने शहरातील इंदिरानगर येथे गोमांस विक्री करणाऱ्या व्यक्तीवर गडचिरोली पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत आरोपी नौशादला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई रविवार, ९ मार्च रोजी दुपारी १ वाजता करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, शहरातील अन्य भागांतही अशा प्रकारच्या विक्रीची शक्यता वर्तवली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांना काही नागरिकांनी इंदिरानगर भागात अवैध गोमांस विक्रीबाबत माहिती दिली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून धडक कारवाई केली आणि आरोपी नौशादला अटक केली. मात्र, त्याचे काही साथीदार घटनास्थळावरून फरार झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ४० किलो गोमांस, एक चारचाकी टेम्पो, एक ऍक्टिवा दुचाकी आणि मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.
गोमांस परीक्षणासाठी ते पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. नागरिकांमधून गोहत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आरोपी नौशादविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याच्यावर यापूर्वीही ३-४ ठिकाणी गोमांस विक्रीप्रकरणी गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crime news #gadchirolicrime #vishva hindu parishad #gohatya #gomans #cow #crime #indiranagar #gadchirolilocalnews)