The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : शहरातील इंदिरा नगर भागात पुन्हा एकदा गोमांस विक्रीचा प्रकार उघडकीस आला असून, हिंदुत्ववादी संघटनांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी २५ किलो गोमांस जप्त करत एकाला अटक केली आहे. इतर दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, या प्रकारामुळे शहरात धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बजरंग दल, शिवसेना व विश्व हिंदू परिषद यांच्या कार्यकर्त्यांना इंदिरा नगर येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी एक मुस्लिम व्यक्ती, त्याची पत्नी आणि दोन मुलांसह गोमांस विक्री करताना आढळून आले. तात्काळ पोलिसांना सूचित करण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आभा गजभिये यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी गोमांसाचे नमुने चार प्लास्टिक डब्यांमध्ये घेतले, तर उर्वरित २५ किलो गोमांस नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी मारुती रिट्झ (MH 31 DV 1533) वाहन जप्त केले असून, आहान नौशाद या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, नौशाद अब्बास कुरेशी आणि रेहान नौशाद कुरेशी हे दोघे घटनास्थळावरून फरार झाले. पोलिस विभागातील माहिती लीक झाल्याने आरोपी पळून गेल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.
दरम्यान, या आरोपींवर यापूर्वीही गोमांस विक्रीचे गुन्हे दाखल झाले होते. तरीही ते न्यायालयातून सहज जामिनावर सुटत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
शिवसेना, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी या आरोपींना तात्काळ गडचिरोलीहद्दपार करण्याची मागणी केली आहे. तसेच, हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी करण्यात आली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #गोमांसविक्री #गडचिरोली #हिंदूभावना #धाडकारवाई #पोलिसकारवाई #AccusedArrested #GadchiroliBeefIssue