बेडगाव होणार अवैध दारूविक्रीमुक्त गाव ; विक्री करणाऱ्यांवर दंडासह कायदेशीर कारवाईचा इशारा
– ग्रामसभेचा ठराव – महिलांचा पुढाकार, मुक्तिपथ चमूची उपस्थिती
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : जिल्ह्याच्या उत्तर टोकावर असलेल्या कोरची तालुक्यातील बेडगाव गावाने अवैध दारूविक्रीविरुद्ध ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अवैध दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत एकमताने गाव दारूमुक्त करण्याचा ठराव पारित केला असून, दारू विक्री किंवा सेवन करून गोंधळ घालणाऱ्यांवर दंडासह कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गावात बेकायदेशीररीत्या चालणाऱ्या दारूविक्रीमुळे पुरुषांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले होते. यामुळे महिलांवर घरगुती अत्याचार, आर्थिक संकट आणि सामाजिक तणाव वाढल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. महिलांसह प्रतिष्ठित नागरिकांनी गावातून कायमस्वरूपी अवैध दारूविक्री हद्दपार करण्याचा निर्णय घेतला.
मुक्तिपथ चमूच्या उपस्थितीत ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. सभेने सर्वानुमते दारूविक्रीबंदीचा ठराव मंजूर केला. या ठरावानुसार, दारू विक्री करणाऱ्यास ५ हजार रुपये दंड व पोलिस कारवाई, तर दारू पिऊन गावात गोंधळ करणाऱ्यास २ हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानंतर ग्रामस्थांनी बेडगाव पोलिस ठाण्यात निवेदन देऊन दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे. या निर्णायक ग्रामसभेला सरपंच चेतन किरसान, मुक्तिपथच्या अरुणा गोंनाडे, पोलिस पाटील माधुरी गद्देवार, तमूस अध्यक्ष दामोदर बोगामा, राकेश पारडवार, नामदेव कोरेटी, अशोक कऱ्हाडे, जयदेव शहारे, सोनाली किरसान, विद्या हेमंत मानकर, ममता मानकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #korchinews #muktipath














