चढ्या दराने खत विक्री केल्यास तुरुंगाची तयारी ठेवा : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

70

– खत लिंकिंग, शेतकऱ्यांची फसवणूक आणि अनधिकृत विक्रीवर फौजदारी कारवाईचे आदेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : गडचिरोली जिल्ह्यात काही खत वितरकांकडून चढ्या दराने खतांची विक्री आणि खत लिंकिंग करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी थेट फौजदारी कारवाई करण्याचे कठोर निर्देश दिले असून, दोषींना तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली खत कंपन्यांचे प्रतिनिधी, लहान-मोठे वितरक यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गोकूल, सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन, रणजित यादव, नमन गोयल तसेच कृषी अधीक्षक प्रीती हिरळकर उपस्थित होते.

खत साठा जिल्ह्यातच राहिला पाहिजे

जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, गडचिरोलीसाठी मंजूर खताचा साठा इतर जिल्ह्यांत वळविण्याचा प्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. खताचा पुरवठा नियमित ठेवण्याचे आदेश देत त्यांनी बफर स्टॉकमधील खत तातडीने वितरित करण्यास सांगितले.

शेतकऱ्यांना फसवणूक केल्यास थेट गुन्हा

“खत घेणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्य वस्तू खरेदी करण्याची सक्ती करणे, लिंकिंग करणे किंवा दरवाढ करून विक्री करणे हा गुन्हा मानला जाईल,” असे सांगत त्यांनी संबंधित वितरकांविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

वितरणात पारदर्शकता अनिवार्य

खत कंपन्यांनी रॅक कधी लावले जातील, याची पूर्वसूचना प्रशासनाला देणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. खत वितरणाची साखळी पारदर्शक ठेवण्याचा आग्रह त्यांनी धरला.
प्रशासनाच्या या कड्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, खत काळाबाजार व बेकायदेशीर व्यवहारांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #खतलिंकिंग #फौजदारीकारवाई #जिल्हाधिकारीअविश्यांतपंडा #शेतकरीहित #खतकाळाबाजार #खतवितरण #कृषीविभाग #FertilizerBlackMarket #GadchiroliNews #AgriculturalReform

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here