गडचिरोलीत माओवाद्यांचे तब्बल ४४ स्मारके एकाच दिवशी जमीनदोस्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक मानली जाणारी तब्बल ४४ स्मारके आज एकाच दिवशी उध्वस्त करण्यात आली. सी-६०, सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाच्या १८ पथकांतील सुमारे ८०० जवानांनी समन्वयाने राबविलेल्या व्यापक शोधमोहीमेत ही कारवाई यशस्वीपणे पार पडली. या निर्णायक मोहिमेमुळे माओवादी चळवळीच्या उरलेल्या प्रतीकांवर मोठा आघात झाला आहे.
दुर्गम व अतिदुर्गम भागांत उभारण्यात आलेली ही स्मारके स्थानिक नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी वापरली जात होती. गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या प्रभावी माओवादविरोधी कारवायांमुळे जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उरलेली दहशतीची प्रतीके हटविण्याचा निर्धार पोलीस दलाने केला.
१६ बिडीडीएस पथक, विशेष अभियान पथक, सीआरपीएफ तसेच विविध पोस्टे, उपपोस्टे व पोमकें येथील जवानांनी १५ हद्दींमध्ये सखोल शोधमोहीम राबवून ४४ स्मारके शोधून काढली. परिसराची कसून तपासणी केल्यानंतर सर्व स्मारके सुरक्षितरित्या जमीनदोस्त करण्यात आली. एटापल्ली (१८), हेडरी (१७), भामरागड (५), जिमलगट्टा (२), धानोरा (१) आणि पेंढरी (१) या उपविभागांतील स्मारकांचा यात समावेश आहे. पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी आणि गट्टा (जां.) या अतिदुर्गम भागांमध्येही कारवाई करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे. नागरिकांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करावे. गडचिरोली पोलीस दल जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.”
या कारवाईनंतर परिसरात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून, नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास बळकट झाल्याचे चित्र आहे. गडचिरोली जिल्हा शांतता आणि विकासाच्या दिशेने ठामपणे पुढे जात असल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














