The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, दि. ५ : तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या पालोरा परिसरातील झुडपी जंगलात सुरु असलेल्या अवैध कोंबडा बाजारावर आरमोरी पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत ९ मोटारसायकल, ३ कोंबडे आणि विविध साहित्य असा एकूण ४,३७,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पालोरा येथील नहराजवळील झुडपी जंगल परिसरात काही इसम कोंबड्यांच्या पायांना धारदार लोखंडी काती बांधून पैशाची हारजितीची झुंज खेळवत होते.
सदर धाड मोहीम पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक गोकुलराज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या आदेशान्वये सपोनि प्रताप लामतुरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. या कारवाईत पो.उ.नि. नरेश सहारे, पो.ह.वा. प्रेमानंद लाडे, पो.शि. निलेश्वर कुमोटी, म.पो.शि. वैष्णवी पोतुला आणि चा.पो.शि. पवन बारापात्रे यांनी सहभाग घेतला.
पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी पोलिसांना पाहून पसार होण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून दोन आरोपींना पकडले. घटनास्थळाची पाहणी केली असता ९ मोटारसायकल, ३ कोंबडे आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात आरोपी म्हणून अमर कामसेन खोब्रागडे, मोहित रमेश मने, कुंदन संतोष कांबळे, विक्की संतोष कांबळे, श्याम अशोक जांभुळे, भुषन काशिनाथ मने, पराग देवराव हजारे, प्रधुम्न हरिभाऊ नेवारे, आकाश मारोती दुमाने आणि अकिंत मोरेश्वर मने (सर्व रा. आरमोरी, जि. गडचिरोली) अशी नावे समोर आली असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर प्रकरणी सपोनि प्रताप लामतुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.उ.नि. नरेश सहारे करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews














