अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं ; २४२ प्रवासी आणि माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा समावेश

1242

The गडविश्व
अहमदाबाद, दि. १२ : गुजरातमधील अहमदाबाद शहरातील मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचं एक प्रवासी विमान कोसळल्याने एक मोठी दुर्घटना घडली आहे. या विमानात २४२ प्रवासी आणि १० क्रू सदस्य होते. विशेष म्हणजे, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेने दुपारी १.३१ वाजता उड्डाण करत होते. मात्र, उड्डाणानंतर अवघ्या सात मिनिटांत, म्हणजे १.३८ वाजता विमानाचा संपर्क तुटला आणि काही क्षणांतच ते मेघानीनगर येथील एका रुग्णालयाच्या इमारतीवर कोसळले. दुर्घटनास्थळी भीषण स्फोट झाला असून धुराचे लोळ आकाशात पसरलेले दिसून आले.
दुर्घटनास्थळी ३ अग्निशमन दलाच्या गाड्या, एनडीआरएफचे जवान, आणि स्थानिक प्रशासन तात्काळ दाखल झाले असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. विमान अपघातात मोठ्या जिवितहानीची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं.
विमानात भरपूर इंधन असल्यामुळे स्फोट अत्यंत तीव्र होता. ज्या रुग्णालयावर हे विमान कोसळलं, त्या रुग्णालयातील १५ डॉक्टर आणि काही रुग्ण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
दुर्घटनेपूर्वी कॅप्टन सुमित सभरवाल यांनी नियंत्रण केंद्राशी ‘मे डे कॉल’ करून आपत्कालीन परिस्थितीची सूचना दिली होती. सभरवाल यांना ८२०० तासांचं उड्डाणाचं अनुभव असूनही ही दुर्घटना घडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
दुर्घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण आहे. प्रवाशांची यादी व मृतांच्या आकड्यांची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here