गडचिरोलीत कृषि निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

24

– शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी कृषी विभाग सज्ज
The गडविश्व
गडचिरोली, दि.२१ : खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर व गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व किटकनाशके मिळावीत तसेच तक्रारींवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या कृषि विभागात ‘निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे.
खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ ऑगस्ट २०२५ आणि रबी हंगामासाठी १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान हा कक्ष सक्रीय राहणार आहे. नागरिकांनी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत भ्रमणध्वनी क्रमांक ८२७५६९०१६९ किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर संपर्क साधावा, अशी माहिती कृषि विकास अधिकारी कु. किरण खोमणे यांनी दिली. तसेच dsaogad15@gmail.com / adozpgad@gmail.com या ई-मेलद्वारे देखील तक्रारी नोंदवता येतील.
जिल्ह्यात एक जिल्हास्तरीय आणि प्रत्येक तालुक्यात एक अशा एकूण १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. बोगस बियाणे व खते विक्री करणाऱ्यांविरोधात परवाना रद्द करण्यासह कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
बोगस कंपन्यांपासून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विभागाने बारीक लक्ष ठेवले असून, युरिया खताचा जादा दराने विक्री किंवा इतर खतांची लिकिंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
शेतकरी, विक्रेते आणि कंपनी प्रतिनिधींनी या कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here