गडचिरोली-आरमोरी महामार्गावरील अपघातांवर प्रशासनाचे कठोर पाऊल ; सुरक्षा उपाययोजना २४ तासांत करा, अन्यथा…

38

गडचिरोली-आरमोरी महामार्गावरील अपघातांवर प्रशासनाचे कठोर पाऊल ; सुरक्षा उपाययोजना २४ तासांत करा, अन्यथा…
– राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : गडचिरोली ते आरमोरी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वर गेल्या काही महिन्यांपासून वाढत चाललेल्या अपघातांच्या मालिकेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविनाश पंडा यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना थेट ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
या रस्त्यावर झालेल्या वारंवार अपघातांमुळे आणि जीवितहानीमुळे महामार्ग विभागाकडून निष्काळजीपणाचे गंभीर स्वरूप उघड झाले असल्याचे नमूद करून, २४ तासांच्या आत खुलासा सादर न केल्यास शिस्तभंगविषयक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
१४ ऑक्टोबर रोजी प्लॅटिनम ज्युबिली शाळेजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अहवालावरून ही कठोर नोटीस देण्यात आली आहे.

महामार्गाची दुरवस्था : अपघातास कारणीभूत घटक स्पष्ट

सदर अहवालात नमूद करण्यात आले आहे की, पावसाळ्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, हे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहनचालक रस्त्याची लेन धोकादायकरीत्या बदलतात. परिणामी, समोरासमोर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
रस्त्याची रुंदी केवळ सात मीटर असून दोन अवजड वाहने एकाच वेळी जाताना धोका निर्माण होतो. त्यामुळे महामार्गाचे तातडीने रुंदीकरण व मध्यभागी मिडीयन तयार करण्याची गरज असल्याचेही अहवालात नमूद आहे.
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या १.४ मीटरच्या रोड शोल्डरवर झुडपे वाढल्याने दृश्यमानता कमी होत आहे. या झुडपांची तात्काळ छाटणी करून शोल्डर मुख्य रस्त्याच्या पातळीवर आणण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

सुरक्षा फलक, ब्लिंकर्स आणि वेगमर्यादा फलक लावण्याचे आदेश

सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केलेले वेगमर्यादा फलक तत्काळ प्रदर्शित करावेत. तसेच शाळा, रुग्णालये आदी संवेदनशील ठिकाणी आयआरसीच्या नियमानुसार सुरक्षा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मिडीयन व गर्दीच्या ठिकाणी ब्लिंकर्स तसेच उताराच्या भागात रम्बलर स्ट्रिप्स बसवून वेग नियंत्रणाची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही नोटीसमध्ये देण्यात आल्या आहेत.
महामार्गावरील वाढती अपघातांची साखळी रोखण्यासाठी प्रशासनाकडून दाखवलेली ही तातडीची दखल नागरिकांत समाधान व्यक्त करत असली, तरी पुढील काही दिवसांत या आदेशांची अंमलबजावणी कशी केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #accident

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here