The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि. ११ : लग्नसमारंभावरून परतताना कोरेगाव येथील दोन तरुणांचा दुचाकीने अपघात झाला असून, यामध्ये देवेंद्र पुरुषोत्तम पुराम (वय २७) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला सुजल सुरेश आळे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
ही घटना शनिवारी रात्री उशिरा कोरेगाव–कसारी मार्गावर घडली. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की देवेंद्रचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
देवेंद्र पुराम हा कोरेगाव गावात सामाजिक कार्यासाठी ओळखला जात होता. विविध उपक्रम, मदतकार्य, व तरुणांना संघटित करण्यामध्ये त्याचे योगदान महत्त्वाचे होते. त्याच्या अचानक निधनाने गावावर शोककळा पसरली असून, अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
घटनेचा तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून, अज्ञात वाहनाचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
