नोकरीपेक्षा पुढे एक पाऊल : लॉईड्सकडून कर्मचाऱ्यांना शेअरधारक बनवण्याची योजना

53

The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : कर्मचारी केवळ कामगार न राहता कंपनीचे भागीदार व्हावेत, या उद्देशाने लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) कडून कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ESOP) राबविण्यात येत असून, याअंतर्गत सोमवारी १,६९२ कर्मचाऱ्यांना ESOPs चे वाटप करण्यात आले. आतापर्यंत एकूण १०,६३१ कर्मचाऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यात आला आहे.

व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली लॉईड्स ग्रुप गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देत आहे. एकेकाळी नक्षलवादासाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागाला उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात कंपनीने मोलाची भूमिका बजावली आहे.

हेडरी झोन, सुरजागड येथे आयोजित ESOP वितरण समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

कर्मचाऱ्यांना संबोधित करताना प्रभाकरन यांनी सांगितले की, ESOPs मुळे कर्मचारी आता केवळ नोकरी करणारे नसून कंपनीचे शेअरधारक व भागीदार झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच LMEL ची वेगवान प्रगती होत असून, त्याचा थेट फायदा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

गडचिरोलीच्या विकासामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी असून, लॉईड्स मेटल्स ती प्रत्यक्षात आणत असल्याचे त्यांनी सांगितले. या भागाच्या प्रगतीसाठी योगदान देणे ही राष्ट्रसेवा असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

गडचिरोलीला “नवीन जमशेदपूर” म्हणून उभारण्याची दीर्घकालीन संकल्पना मांडत, भविष्यात कंपनीतील एखादा कर्मचारी संचालक पदापर्यंत पोहोचेल, असा विश्वास प्रभाकरन यांनी व्यक्त केला.

समारोपप्रसंगी या दुर्गम भागात सेवा देणाऱ्या डॉक्टर, अभियंते व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले. सुरक्षित, समावेशक व समानतेवर आधारित कार्यसंस्कृतीमुळे कंपनी आणि गडचिरोली जिल्हा एकत्र प्रगती करत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here